नवी दिल्ली - भारताचा माजी कर्णधार आणि दादा म्हणून ओळख असलेल्या सौरव गांगुली बंगाल क्रिकेटच्या (सीएबी) अध्यक्षपदी विराजमान झाला आहे. सीएबीच्या ८८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) गांगुलीने कार्यभार स्वीकारला. बंगाल क्रिकेटच्या अध्यक्षपदी गांगुलीची दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
हेही वाचा - टेनिस : ब्यूनस आयर्स एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा सुमित नागल दाखल
या नियुक्तीनंतर गांगुली म्हणाला, 'मी आनंदी आहे. ही नियुक्ती १० महिन्यांसाठी असली तरीही काळ मोठा आहे. पुढचे पाऊल काय असेल हे मला माहित नाही. अशा मोठ्या संस्था चालवण्यासाठी यापूर्वी कमी अधिकारी होते. आता ही संख्या जास्त आहे.'
२०१४ मध्ये गांगुली सीएबीच्या कार्यकारी समितीचा भाग होता. शिवाय त्याच्याकडे संयुक्त सचिव हे पदही होते. जगमोहन दालमिया यांच्या मृत्यूनंतर २०१५ मध्ये पहिल्यांदा दादाची सीएबीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. २०२० पर्यंत तो अध्यक्षपदी असणार आहे. माजी क्रिकेटपटू स्नेहाशीष गांगुली आणि गार्गी बनर्जी यांना परिषदेच्या इतर सदस्यपदावर नियुक्त केले गेले आहे.