नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज शेन वॉटसनने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वॉटसनने २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर वॉटसनने हा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जने शेन वॉटसनला अखेरच्या लीग सामन्यातील अंतिम अकरामध्ये स्थान दिले नाही. वॉटसनने आपला शेवटचा आयपीएल सामना २९ ऑक्टोबरला कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध खेळला होता.
शेन वॉटसन आयपीएल २०२०मध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. या खेळाडूने ११ सामन्यांत केवळ २९.९०च्या सरासरीने २९९ धावा केल्या. वॉटसनने यंदा २ अर्धशतके ठोकली. चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएलमध्ये पहिल्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही.
२०१८मध्ये चेन्नईत दाखल -
शेन वॉटसनला २०१८मध्ये चेन्नईने लिलावात संघात घेतले. २०१९च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने मोठी भूमिका बजावली. या विजयासह चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. चेन्नईकडून खेळताना शेन वॉटससने २०१८मध्ये ५५५ तर २०१९मध्ये ३९८ धावा केल्या होत्या.
निवृत्ती घेताना भावूक -
शेन वॉटसनने चेन्नईच्या ड्रेसिंग रूममध्ये निवृत्ती घेतल्याबद्दल सांगितले, यावेळी तो भावूक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शेन वॉटसन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. २००८मध्ये राजस्थान रॉयल्सला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात वॉटसनने मोलाचे योगदान दिले होते.