मुंबई - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने भारतीय संघाला विश्वकरंडकापूर्वी एक सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलिया २४ फेब्रुवारीपासून भारत दौऱ्याला सुरुवात करणार आहे. यावेळी सलामीला भारताने रोहितसोबत शिखरऐवजी ऋषभ पंतला सलामीला पाठवावे, असा सल्ला दिला आहे.
शेन वॉर्न म्हणाला, इंग्लंड येथे होणाऱ्या आगामी विश्वकरंडकाच्या तयारीसाठी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मासोबत ऋषभला २ सामन्यांसाठी सलामीला पाठवावे. यासाठी धवनला दुसरी भूमिका बजवावी लागेल.
रोहित-शिखर जोडीबाबत वॉर्न म्हणाला, रोहित बरोबर सलामीला येवून शिखरने चांगली फलंदाजी केली आहे. परंतु, रोहित सोबत ऋषभ सलामीला आल्यास भारतासाठी हे फायद्याचे ठरेल. अशा एक्स फॅक्टर्सने तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला आश्चर्यचकीत करू शकता.
सध्या २१ वर्षाचा असलेला ऋषभ पंतचे एकदिवसीय संघातील स्थान निश्चित नाही. संघात यष्टीरक्षकाच्या स्वरुपात महेंद्रसिंह धोनी असल्यामुळे ऋषभला बाहेर बसावे लागते. परंतु, वॉर्नचे यावर मत वेगळे आहे. वॉर्न म्हणाला, ऋषभला स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळवल्यास दोन्ही खेळाडू एकाचवेळी संघात खेळू शकतात.