नवी दिल्ली - भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) एक विनंती केली आहे. आयपीएलसाठीच्या समालोचकांच्या पॅनलमध्ये पुन्हा सामील करून घ्यावे, असे मांजरेकरांनी बीसीसीआयला म्हटले आहे.
यावर्षी मार्च महिन्यातील भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी मांजरेकरांना समालोचकांच्या गटामधून काढून टाकले गेले होते. तथापि, ही मालिका कोरोनामुळे झाली नाही. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आयपीएलमध्ये पुन्हा समालोचन करायला मिळावे, अशी मांजरेकरांची इच्छा आहे.
इतकेच नव्हे तर, मंडळाला पाठवलेल्या मेलमध्ये मांजरेकरांनी बीसीसीआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात मांजरेकरांनी पुन्हा मंडळाला एक मेल पाठवला आहे.
मांजरेकरांनी सीएएविरुद्ध मुंबईमध्ये झालेल्या रॅलीचे समर्थन केले होते. बीसीसीआयच्या समालोचन पॅनलमधून वगळण्याचे कारण नागरिकता संशोधन कायद्याला (सीएए) विरोध आणि जेएनयूचे समर्थन असल्याचेही म्हटले गेले. त्यांनी जेएनयूमध्ये झालेल्या हाणामारीचा विरोध केला होता. मांजरेकर यांनी अनेकदा सीएएचा सार्वजनिक विरोध केलेला आहे.
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी गेल्या तीन विश्वचषकासाठी आणि आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्येही समालोचन केले आहे. 1996 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून संजय मांजरेकर सातत्याने समालोचन करत होते.