मुंबई - दक्षिण आफ्रिकेचे काही खेळाडू पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका अर्धवट सोडून आयपीएल खेळण्यासाठी भारतात दाखल झाले. या विषयावरून पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू चांगलाच भडकला आहे. त्याने टी-२० मुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम होतोय, हे पाहून मला वाईट वाटत, असे म्हटलं आहे.
दक्षिण आफ्रिका-पाकिस्तान यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील दुसरा सामना पार पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक, वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि एनिच नॉर्टजे आयपीएल खेळण्यासाठी भारताकडे रवाना झाले. त्यांनी उभय संघातील मालिका अर्धवट सोडली. या विषयावरून शाहिद आफ्रिदी भडकला आहे.
आफ्रिदीने या संदर्भात ट्विट केले आहे. तो त्यात म्हणाला की, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर टी-२० लीगचा परिणाम होत आहे. हे पाहून मला वाईट वाटते. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने मालिका अर्धवट सोडून खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली कशी? याचे कोडं मला आहे. याबाबत मंडळाने पुन्हा विचार करण्याची गरज आहे.'
दरम्यान, आफ्रिका-पाकिस्तान यांच्यातील निर्णायक सामना पाकिस्तानने २८ धावांनी जिंकत मालिका खिशात घातली. पाकने निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, फखर झमान (१०१) आणि कर्णधार बाबर आझम (९४) यांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकात ७ बाद ३२० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेचा संघ ४९.३ षटकात २९२ धावांवर ऑलआऊट झाला.
हेही वाचा - IPL २०२१ : उसेन बोल्टचा RCB ला खास संदेश; विराट, डिव्हिलियर्सने दिली भन्नाट प्रतिक्रिया
हेही वाचा - IPL २०२१ : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! रोहितने आयपीएलपूर्वीच दाखवला फटकेबाजीचा ट्रेलर