मुंबई - भारतीय क्रिकेट बोर्डाची (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण बैठक (एजीएम) लवकरच पार पडणार आहे. या बैठकीत महत्वाचा निर्णय अंमलात येण्याची शक्यता आहे. काही वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, क्रिकेट सल्लागार समितीत माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - SL VS PAK : दिनेश चंडीमलचे लंकेच्या संघात पुनरागमन, पाकिस्तानात १० वर्षानंतर होणार कसोटी सामना
सचिन, लक्ष्मण हे बीसीसीआयचा नवीन अध्यक्ष सौरभ गांगुलीसमवेत पहिल्या सीएसीमध्ये होते. 'गांगुली वगळता सचिन आणि लक्ष्मण लवकरच क्रिकेट सल्लागार समितीत पुनरागमन करु शकतात', असे पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती मिळाली आहे. मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात १ डिसेंबरला ही सभा होणार आहे.
या बैठकीमध्ये कूलिंग ऑफ पीरियडसंबंधी निर्णय घेण्यात येणार असून समिती आणि उपसमितीमध्ये असलेली ७० वर्षांची वयोमर्यादाही बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. लाभाचे पद भूषवल्याच्या तक्रारीनंतर सचिन आणि लक्ष्मणला आपल्या सल्लागार समिती सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला होता.