नवी दिल्ली - न्यूझीलंडविरूद्धच्या टी-२० मालिकेत भारताने ५-० ने दमदार विजय मिळवला. माऊंट माउंगानुई येथे खेळलेल्या शेवटच्या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने अर्धशतक झळकावत टी-२० मध्ये विराट कोहलीला मागे टाकले आहे.
हेही वाचा - जोकोव्हिचची रंगतदार लढतीत बाजी, जिंकली आठव्यांदा ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धा
बे ओव्हलवर झालेल्या सामन्यात रोहितने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २५ वे अर्धशतक झळकावले. या प्रकारात सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित पहिल्या स्थानी पोहोचला आहे. विराटच्या खात्यात टी-२० क्रिकेटमध्ये २४ अर्धशतके जमा आहेत. न्यूझीलंडविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात विराटला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे रोहितने संघाचे नेतृत्व केले.
रोहित ६० धावांवर असताना पोटरीचे स्नायू दुखावल्याने त्याला मैदान सोडावे लागले. अर्धशतकी खेळीमुळे रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा पूर्ण करणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत त्यालाही स्थान मिळाले आहे. या यादीत मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, विरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्यासोबत रोहितच्या नावाचाही समावेश झाला आहे.