मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. या संवादामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना रोहितने उत्तरे दिली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिहेरी शतक आणि टी-20 क्रिकेटमध्ये दुहेरी शतक यापैकी काय करायला आवडेल? या प्रश्नाला रोहितने थेट उत्तर दिले.
''या दोन्ही गोष्टी करताना मजा येईल'', असे रोहितने या प्रश्नाचे उत्तर दिले. एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावा करण्याचा विश्वविक्रम रोहितच्या नावावर आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने तीन वेळा दुहेरी शतके ठोकली आहेत.
सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यापैकी कोणाला निवडशील?, या प्रश्नाला रोहितने ''मरवाओगे क्या?'', असे मजेशीर उत्तर दिले. त्याचबरोबर रोहितने शिखर धवनचा उल्लेख 'गब्बर' आणि हार्दिक पांड्यांचा उल्लेख 'एक गुणवान क्रिकेटपटू' असा केला.
सध्याच्या क्रिकेटविश्वातील चपळ क्षेत्ररक्षक म्हणून रोहितने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलचे नाव घेतले आहे.