दुबई - आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचा मला आणि माझ्या संघाला पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने दिली. आज आयपीएलच्या अंतिम सामन्यात त्यांचा मुकाबला दिल्ली कॅपिटल्स संघाशी होणार आहे. तेराव्या हंगामात उभय संघात ३ सामने झाले आहेत. यात मुंबईने तिनही सामने एकतर्फा जिंकली आहेत. यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईने आयपीएलच्या साखळी फेरीत ९ विजयासह १८ गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले. त्यानंतर त्यांनी पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीचा पराभव करत थाटात अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे दिल्लीला आणखी एक संधी होती. यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली.
अंतिम सामन्याआधी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, 'मला आणि माझ्या संपूर्ण संघाला, आम्ही सामन्यासह विजेतेपद पटकावू अशा विश्वास आहे. दिल्लीने क्वालिफायर सामन्यात चांगला खेळ केला. यामुळे त्यांना सायकॉलॉजिकल अॅडवान्टेज जरूर मिळेल. पण मला विश्वास आहे की आम्हीच पाचव्यांदा विजेते होऊ.'
आयपीएलमध्ये प्रत्येक दिवस हा वेगळा ठरतो. यात दिवसागणिक नविन आव्हाने असतात. प्रत्येक सामना हा वेगळाच असतो. यामुळे याआधी काय झाले याबाबत विचार करू शकत नाही, असेही रोहितने सांगितले.
संभाव्य संघ
- मुंबई इंडियन्स - क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंड बोल्ट, राहुल चाहर आणि जसप्रीत बुमराह.
- दिल्ली कॅपिटल्स - शिखर धवन, मार्कस स्टॉयनिस, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, प्रवीण दुबे, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा आणि एनरिक नॉर्जिया.
हेही वाचा - IPL इतिहासात प्रथमच दिल्ली फायनलमध्ये; जाणून घ्या आजपर्यंतचे विजेते
हेही वाचा - IPL २०२० MI vs DC Final : दिल्लीची 'दिवाळी' की मुंबई मारणार 'पंच'