मुंबई - एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीत दुहेरी शतक ठोकेण असा कधी विचारही केला नव्हता, असे भारतीय सलामीवीर रोहित शर्माने म्हटले आहे. बंगळुरू येथे 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने दुहेरी शतक केले होते. इतकेच नव्हे तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके करणारा रोहित हा भारताचा एकमेव फलंदाज आहे.
फिरकीपटू रविचंद्रन अश्विनसोबतच्या चर्चेदरम्यान रोहित म्हणाला, "मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतकाचा विचार केला नव्हता, मला चांगली फलंदाजी करायची होती आणि खेळपट्टीही चांगली होती." रोहितने 158 चेंडूत 209 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 16 षटकार लगावले होते. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 57 धावांनी पराभूत केले होते.
रोहित म्हणाला, "मला आठवते की युवी (युवराज सिंग) मला सांगत होता की सलामीवीर म्हणून तुला मोठी धावसंख्या बनवण्याची संधी आहे. जेव्हा मी दुहेरी शतक ठोकून परत पॅव्हेलियनमध्ये गेलो, तेव्हा कोणीतरी मला सांगितले की, तू जर आणखी एक षटक फलंदाजी केली असती तर वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडित निघाला असता. तीन-चार लोक होते ज्यांना अशी अपेक्षा होती की मी आणखी 10-15 धावा करायला हव्या होत्या.''