अबुधाबी - इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सकडून ४ हजार धावा पूर्ण करण्यापासून रोहित शर्मा केवळ ८६ धावा दूर आहे. आज अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रोहितला ही कामगिरी करण्याची संधी असेल.
रोहितने आयपीएलमध्ये ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या १३व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध त्याने हा पराक्रम केला. रोहितने आयपीएलमध्ये १९३ सामन्यांत ५ हजार ७४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि ३८ अर्धशतके आहेत. रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४४४ चौकार आणि २०५ षटकार ठोकले आहेत.
रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना दुसर्या क्रमांकावर आहे. रैनाने आतापर्यंत १९३ सामन्यात ५३६८ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या १३व्या सत्रातून रैनाने माघार घेतली आहे. रैनाच्या नावावर एक शतक आणि ३८ अर्धशतके आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. कोहलीने आतापर्यंत १८२ सामन्यात ५५४५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ५ शतके आणि ३७ अर्धशतके आहेत.