विशाखापट्टणम - दक्षिण आफ्रिकेविरुध्द सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. दमदार फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या आधारावर पहिल्या कसोटीत भारताने आफ्रिकेला २०३ धावांनी पराभूत केले. वाचा या कसोटीत भारतीय खेळाडूंनी केलेले खास विक्रम.
हेही वाचा - 'पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे सुरक्षित पैदास केंद्र'
विराट कोहली -
विशाखापट्टणम येथे पार पडलेला कसोटी सामना हा विराटसाठी कर्णधार म्हणून ४९ वा कसोटी सामना होता. विराटने ४९ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना २९ विजय मिळवले आहेत. दरम्यान, आपल्या नेतृत्वात संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत, अग्रस्थानी ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह वॉ आहे. त्याने आपल्या नेतृत्वात ३६ कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. तर विराटने तिसरे स्थान राखले आहे.
रोहित शर्मा -
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला पहिल्यांदाच खेळताना आफ्रिकेविरुध्द दोनही डावात शतक ठोकणारा रोहित पहिला फलंदाज ठरला. तसेच, त्याने भारताकडून एकाच सामन्याच्या दोनही डावात शतके झळकावणाऱ्यांच्या यादीतही स्थान मिळवले. भारताचे दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांनी तीन वेळा, राहुल द्रविडने दोन वेळा तर विजय हजारे, अजिंक्य रहाणे, विराट कोहली यांनी एकदा, दोनही डावात शतक लगावण्याचा पराक्रम केला आहे. यात आता रोहितचे नाव दाखल झाले आहे.
रवीचंद्रन अश्विन -
आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या ब्रायनला बाद करत अश्विनने मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली. अश्विन हा भारताकडून सर्वात जलद ३५० कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. ३३ वर्षीय अश्विनने ६६ कसोटी सामन्यात हा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ३५० बळी मिळवण्याचा पराक्रम श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर होता. आता अश्विनने मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या विक्रमासोबत अश्विनने भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनाही मागे टाकले आहे. कुंबळेने ७७ सामन्यांमध्ये ३५० बळी घेतले होते.
रवींद्र जडेजा -
या कसोटी सामन्यात डावखुरा गोलंदाज म्हणून फिरकीपटू रवींद्र जडेजाने कसोटीतील सर्वात जलद २०० बळी मिळवण्याची किमया केली. दीडशतकवीर डीन एल्गारला बाद करत त्याने हा विक्रम रचला. या विक्रमामध्ये जडेजाने श्रीलंकेच्या रंगना हेराथला मागे टाकले. त्याने ४७ कसोटी सामन्यांत २०० बळी मिळवले होते. तर, जडेजाने ४४ सामन्यांतच २०० बळी मिळवले आहेत. या दोन खेळाडूनंतर, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनने ४९ कसोटी सामन्यांत २०० बळी मिळवले आहेत.
मयंक अग्रवाल -
तब्बल १० वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून मयंक अग्रवालने दुहेरी शतक झळकावले. २००९ मध्ये वीरेंद्र सेहवागने लंकेविरुद्ध २९३ धावा रचल्या होत्या. तसेच आफ्रिकेविरुद्ध दुहेरी शतक झळकावणारा मयंक हा दुसरा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. याआधी सेहवागनेच ही कामगिरी केली होती.