नवी दिल्ली - भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची शुक्रवारी फेरनिवड करण्यात आली. कपिल देव, अंशुमान गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या सल्लागार समितीने शास्त्री यांची निवड केली. यामुळे शास्त्री २४ डिंसेबर २०२१ पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत. दरम्यान, शास्त्री यांच्या प्रशिक्षणात भारतीय संघाने केलेली कामगिरी पाहू...
२०१७ साली अनिल कुंबळे यांच्या ठिकाणी रवी शास्त्री यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हा पासून मागील २ वर्षे शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. मात्र, त्यांच्या प्रशिक्षणात भारतीय संघाला मोठमोठ्या स्पर्धेत पराभूत व्हावे लागले आहे. तर काही ऐतिहासिक कामगिरीही भारतीय संघाने त्यांच्या मार्गदर्शनात केली.
टेस्ट रेकार्ड -
रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनात, भारतीय संघाने एकूण आतापर्यंत २१ कसोटी सामने खेळले आहेत. यात भारतीय संघाने, ११ सामन्यात विजय मिळवला आहे तर ७ सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले आहे आणि रहिलेले ३ सामने ड्रॉ झाले आहेत.
एकदिवसीय रेकार्ड -
एकदिवसीय आकडेवारी पाहता, भारतीय संघाने शास्त्री यांच्या मार्गदर्शनात ६३ सामने खेळले आहेत. यात भारतीय संघ ४५ सामने जिंकला आहे तर १५ सामने पराभूत झाला आहे. तसेच यात २ सामने टाय झाली आहेत तर एक सामन्याचा निकाल लागलेला नाही.
टी-२० रेकार्ड -
भारतीय संघाची टी-२० आकडेवारी पहिल्यास भारताने, ३७ सामने खेळले असून यात २५ मध्ये विजय आणि ११ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. तर एक सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.