पुणे - रणजी करंडक स्पर्धेच्या 'क' गटात जम्मू-काश्मीर संघाने महाराष्ट्राच्या संघाला दणका दिला. पुणे येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात जम्मू-काश्मीरने महाराष्ट्राचा ५४ धावांनी पराभव केला. महाराष्ट्राकडून २१ वर्षीय दिग्विजय देशमुख याने ८३ धावांची दमदार खेळी केली. मात्र, तोही संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. दरम्यान, महाराष्ट्राचा हा सलग दुसरा पराभव आहे.
जम्मू-काश्मीरने महाराष्ट्राच्या संघासमोर ३६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्राचा संघ ३०९ धावांवर आटोपला. सामन्यांत एकूण ९ बळी घेणारा नझीर 'सामनावीर' पुरस्काराचा मानकरी ठरला. गुरुवारच्या ५ बाद १९२ धावांवरून पुढे खेळताना, नाबाद असलेल्या अंकित बावणे एक धावांची भर घालून परतला. त्यानंतर आठव्या स्थानावर आलेल्या दिग्विजयने ७१ चेंडूंतच ८३ धावा केल्या.
एकवेळ महाराष्ट्र विजयी ठरणार असे वाटत असताना, नझीरने दिग्विजयला बाद केलं. दिग्विजयने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकार लगावले. त्यानंतर महाराष्ट्राच्या तळातील फलंदाजाना जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांनी फार काळ टिकू दिलं नाही. जम्मू काश्मीरकडून नझीर आणि मोहम्मद मुद्दसिर यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले.
दरम्यान, रणजी करंडक स्पर्धेत जम्मू-काश्मीरचा संघ सलग दोन विजयांसह गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे, तर महाराष्ट्र मात्र सलग दुसऱ्या पराभवामुळे आठव्या स्थानी घसरला आहे. महाराष्ट्राचा पुढील सामना २५ डिसेंबरपासून छत्तीसगडविरुद्ध रंगणार आहे.