राजकोट - रणजी करंडक स्पर्धेच्या ८६ वा हंगामाचा अंतिम सामना सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात खेळला जात आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात सौराष्ट्रने दुसऱ्या दिवसाअखेर ८ बाद ३८४ धावा केल्या आहेत. चिराग जैनी आणि धर्मेंद्रसिंह जडेजा ही जोडी क्रीजवर नाबाद आहे.
सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आणि पहिल्या दिवशी ५ बाद २०६ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी सौराष्ट्रने २०६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. चेतेश्वर पुजारा आणि अर्पित वसावडा या जोडीने चहापानापर्यंत किल्ला लढवला. दोघांनी १४८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान अर्पित वसावडाने आपले शतक पूर्ण केले. वसावडाने २८७ चेंडूत ११ चौकाराच्या मदतीने १०६ धावांची खेळी केली. त्याचे या हंगामातील लागोपाठ दुसरे, तर कारकिर्दीतील ७ वे शतक ठरले. त्याने मजूमदारला चौकार लगावत शतक पूर्ण केले.
अर्पित वसावडा बाद झाल्यानंतर पुजाराने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील ६० वे अर्धशतक झळकावले. तो मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्याने ६६ धावा केल्या. पुजारापाठोपाठ प्रेरक मांकड शून्यावर बाद झाला. यानंतर चिराग-जडेजा जोडीने सौराष्ट्रला कोणतेही नुकसान होऊ दिले नाही. दुसऱ्या दिवसाअखेर चिराग जैनी (१३) आणि धर्मेंद्रसिंह जडेजा (१३) ही जोडी नाबाद खेळत आहे.
पहिल्या दिवशी तीन गडी बाद करणाऱ्या आकाशदीपला दुसऱ्या दिवशी एकही गडी बाद करता आला नाही. तर मुकेश कुमारने दोन, तर शाहबाज अहमद यांनी एक गडी टिपला.
हेही वाचा - आयपीएलसह आरसीबीला कोरोनाचा फटका, काय आहे प्रकरण वाचा...
हेही वाचा - खेळाडू नाही तर चक्क पंच दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर