मुंबई - रणजी करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या ६२५ धावांना प्रत्युत्तर देताना, मुंबईच्या सर्फराज खानने त्रिशतकी खेळी केली. त्याने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळताना भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग स्टाईलने त्रिशतक पूर्ण केले. त्याच्या झंझावती खेळीमुळे मुंबई संघाने उत्तर प्रदेशविरुद्धचा सामना अनिर्णित राखला. दरम्यान, सर्फराजच्या खेळीनंतर आता एक नवी माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशविरुद्ध फलंदाजीला उतरण्याच्या एक दिवस आधी सर्फराज याला १०२ डिग्री इतका ताप होता. सामना संपल्यानंतर बोलताना सर्फराजने सांगितले की, गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी प्रकृती बिघडली आहे. परंतु मला माझ्या खेळावर विश्वास होता. मी खेळपट्टीवर ठाण मांडल्यास संघाला नक्कीच सावरू शकतो, याची जाणीव होती. त्यामुळेच त्रिशतकी खेळी साकारू शकलो.
एलिट 'ब' गटातील या लढतीत उत्तर प्रदेशच्या पहिल्या डावातील ६२५ धावांच्या प्रत्युत्तरात मुंबईने चौथ्या दिवशी ७ बाद ६८८ धावांवर डाव घोषित केला. पंचांनी सामना अनिर्णित झाल्याचे जाहीर करत मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण बहाल केले. मुंबईने या स्पर्धेत आतापर्यंत ५ सामन्यात १२ गुणाची कमाई केली आहे.
सर्फराजने या सामन्यात ३० चौकार आणि ८ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ३०१ धावा केल्या. त्याला आदित्य तरे (९७), शम्स मुलानी (६५) यांनी चांगली साथ दिली. सर्फराजच्या या खेळीतील खास वैशिष्ट म्हणजे त्याने २५० आणि ३०० धावा षटकार मारून पूर्ण केल्या. भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग देखील अशाच प्रकारे फलंदाजी करायचा.
हेही वाचा - तुझ्या डोक्यावर जेवढे केस नाहीत, त्यापेक्षा जास्त पैसा आहे माझ्याकडे; शोएबचा वीरुवर पलटवार
हेही वाचा - IND VS NZ : टीम इंडिया 'मिशन न्यूझीलंड'साठी सज्ज, बीसीसीआयने शेअर केले फोटो