मुंबई - सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशान आणि जॉन्टी होड्स या दिग्गज खेळाडूंची भरणा असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा पुन्हा प्रारंभ होत आहे. २ ते २१ मार्च दरम्यान या मालिकेतील सामन्यांचे आयोजन केले जाईल. छत्तीसगडच्या रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हे सर्व दिग्गज खेळाडू पुन्हा क्रिकेट खेळताना दिसतील.
हेही वाचा - उत्तराखंडला मोठा धक्का..! मुख्य प्रशिक्षक वसिम जाफरने दिला राजीनामा
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज गेल्या वर्षी सुरू झाली होती, परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. या स्पर्धेचे केवळ चार सामने खेळले गेले. आयोजकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "सचिन तेंडुलकरसह वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशान, मुथय्या मुरलीधरन यांच्यासह पाच देशांचे आणखी अनेक माजी खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि यजमान भारतातील अनेक माजी क्रिकेटपटू भाग घेतील. देशात रस्त्यावरील सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे."
''क्रिकेट हा देशातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि क्रिकेटर्स येथे आदर्श नायक म्हणून पाहिले जातात. या लीगचे उद्दीष्ट लोकांच्या रस्त्यावरील त्यांच्या वागण्याबद्दलची मानसिकता बदलणे हे आहे", असेही आयोजकांनी सांगितले.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी-२० दरम्यान रायपूरमध्ये दिग्गजांचे आयोजन करणे गर्व आणि सन्मानाची बाब आहे. लोकांना रस्त्यावरील धोक्यांबद्दल जागरूक करणे ही एक अप्रतिम संकल्पना आहे. हे फार महत्वाचे आहे, कारण दर चार मिनिटांत एका भारतीयाचा रस्त्यावर मृत्यू होतो.