चेन्नई - भारतीय क्रिकेट संघापासून दूर असणारा डावखुरा फलंदाज सुरेश रैना संघात परतण्यास उत्सुक आहे. त्याने टीम इंडियातील चौथ्या क्रमाकांसाठी स्वत:चा पर्याय सुचवला आहे. मागच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध रैनाने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.
हेही वाचा - बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी 'दादा'च
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रैना बोलत होता. 'मी टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. मी यापूर्वीही चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजीत चांगले प्रदर्शन केले होते. दोन विश्वकरंडक स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत आणि मी संधीच्या शोधात आहे', असे रैना म्हणाला. भारतीय क्रिकेट संघामध्ये चौथ्या क्रमांकाच्या फंलंदाजीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. काही वेळासाठी अंबाती रायडूला या स्थानावर खेळवल्यानंतर विजय शंकरला त्याजागी स्थान दिले गेले होते.
शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर युवा खेळाडू रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले. मात्र पंतची कामगिरी पाहता अजून काही खेळाडूंना संधी मिळू शकते. रैनाने पंतविषयी आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, 'धोनी ज्याप्रमाणे खेळाडूंशी जाऊन बोलतो तसेच पंतलाही मार्गदर्शनाची गरज आहे. क्रिकेटमध्ये मानसिकता महत्वाची असते. त्यामुळे पंतला नैसर्गिकदृष्ट्या आपला आक्रमक खेळ खेळता आला पाहिजे.'
रैनाने धोनीविषयीही आपले म्हणणे मांडले. तो म्हणाला, 'धोनी अजूनही तंदुरुस्त आहे. तो संघाला अजूनही खुप काही देऊ शकतो. आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत त्याची भूमिका महत्वाची असेल.'