मोहाली -पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आय.एस. बिंद्रा मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाबने घरच्या मैदानावर मुंबईचा ८ गडी राखून पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पंजाबसमोर १७६ धावांचे आव्हान दिले होते. पंजाबने हे आव्हान १८.४ षटकात २ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.
१७७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबने तुफानी सुरूवात केली. सलामीच्या फलंदाजांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांनी पहिल्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी केली. लोकेशने या आयपीएल मधील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने ५७ चेंडूत ७१ धावा केल्या. त्यात ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. ख्रिस गेल ४० धावा काढून कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या मयंकनेही हल्लाबोल करत २१ चेंडूत ४३ धावा झोडपल्या. डेव्हिड मिलरने नाबाद १५ धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पंड्याने ४३ धावा देत २ गडी बाद केले. मुंबईच्या इतर गोलंदाजांना एकही गडी बाद करता आला नाही. मयंक अगरवाला सामनावीर किताब देण्यात आला.
सामन्याच्या सुरुवात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या नवव्या सामन्यात मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या आहेत. मुंबईकडून क्विंटन डी-कॉकने ६०, कर्णधार रोहित शर्माने ३२ तर हार्दिक पांड्याने ३१ धावा केल्यात. लोकल बॉय युवराज सिंगने या सामन्यात निराशा केली. मोठा फटका मारण्याच्या नादात तो अश्विनच्या गोलंदाजीवर १८ धावा काढून बाद झाला. पंजाबसाठी मुरगन, शमी आणि विल्जोएन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.