मुंबई - १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाची स्वप्नवत कामगिरी सुरू आहे. चार देशांच्या मालिकेत भारताच्या या संघाने दक्षिण आफ्रिकेला ६६ धावांनी नमवत विजयारंभ केला. ११० धावांची जबरदस्त खेळी करणारा कर्णधार प्रियम गर्ग या विजयाचा शिल्पकार ठरला.
हेही वाचा - 'अनफिट' पाक खेळाडूंना मोठी चपराक, पीसीबीने घेतला 'हा' निर्णय
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ गडी गमावून २६४ धावा केल्या. प्रियमने तिलक वर्मासह तिसर्या विकेटसाठी ९१ आणि ध्रुव जुरेल यांच्यासह चौथ्या विकेटसाठी १०४ धावा जोडल्या. प्रियमने १०३ चेंडूंत ११० धावांमध्ये नऊ चौकार व दोन षटकार ठोकले. तिलकने ४२ धावा केल्या तर ध्रुवने ६५ धावा केल्या. आफ्रिकेकडून मोंडली खुमालोने चार बळी घेतले.
भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात १९८ धावा करू शकला. कर्णधार ब्रेस पार्ससने सर्वाधिक ५७ धावा केल्या. भारत आणि दक्षिण आफ्रिका व्यतिरिक्त झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडचा अंडर १९ संघ चार देशांच्या या स्पर्धेत भाग घेत आहे. भारताचा पुढील सामना ५ जानेवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध खेळवला जाणार आहे. तर ७ जानेवारीला भारत न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. ही मालिका संपल्यानंतर भारतीय अंडर-१९ संघ आयसीसी विश्वचषकात भाग घेईल.