दुबई - आयपीएलच्या चौदाव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जवर ७ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादने चेन्नईला १६५ धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या २० षटकांत ५ गडी बाद १५७ धावा झाल्या. हैदराबादचा युवा खेळाडू प्रियम गर्ग सामनावीर ठरला.
हैदराबादची वरची फळी उद्ध्वस्त झाल्यावर प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवा खेळाडूंनी ७७ धावांची भागीदारी रचत एक रंजक विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलमधील ५०हून अधिक धावा करणारी प्रियम-अभिषेकची सर्वात युवा जोडी ठरली आहे. प्रियम आणि अभिषेकचे एकूण वय ३९ वर्षे ३३५ दिवस असे आहे.
प्रियम आणि अभिषेकच्या आधी हा विक्रम ऋषभ पंत आणि संजू सॅमसनच्या नावावर होता. त्यांनी हैदराबादविरुद्ध एकूण ४० वर्ष ३९ दिवसांत ७२ धावांची भागीदारी केली होती.
हैदराबादची अवस्था ४ बाद ६९ अशी असताना अभिषेक शर्मा आणि प्रियम गर्ग या खेळाडूंनी संघाची कमान सांभाळली. अठराव्या षटकात जडेजा आणि शार्दुल ठाकुरने अभिषेकचे दोन झेल सोडले. मात्र, या जीवदानाचा अभिषेकला फायदा उठवता आला नाही. अभिषेकने ४ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. तर, प्रियम गर्गने २६ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५१ धावा केल्या.