इंदौर - मुंबईच्या संघाने सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात गोव्याविरुद्ध ६ विकेट राखून विजय मिळवला. या स्पर्धेत पहिल्या ३ सामन्यात अपयशी ठरलेला भारताचा युवा फलंदाज मुंबईकर पृथ्वी शॉची बॅट चांगलीच तळपली.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गोव्याच्या संघाने निर्धारीत २० षटकांमध्ये ४ विकेट गमावून १४० धावा केल्या. गोव्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाने १८.२ षटकांत ४ गडी गमावत विजय मिळवला. मुंबईकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने ३१ तर पृथ्वी शॉने ४७ चेंडूत ७१ धावांची अर्धशतकी खेळी केली. पृथ्वीच्या या खेळीत ७ खणखणीत षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता.
सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत खेळल्या गेलेल्या पहिल्या ३ सामन्यात मुंबईकडून खेळताना पृथ्वीला यश मिळाले नव्हते. पहिल्या ३ सामन्यात केवळ तो फक्त १८ धावा करू शकला होता. त्यामुळे पृथ्वीची ही खेळी त्याच्यासाठी महत्वाची मानली जात आहे.