दुबई - युवा खेळाडूंची भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा ४४ धावांनी पराभव केला. काल (२५ सप्टेंबर) रोजी झालेल्या सातव्या सामन्यात चेन्नईचा संघ संथ वाटला. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने ४३ चेंडूत ६४ धावांची अप्रतिम खेळी केली. त्यामुळे पृथ्वीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
या खेळीसह पृथ्वीने एका खास विक्रमात आपल्याच संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर, राजस्थानच्या संजू सॅमसनला पछाडले आहे. आयपीएलमध्ये वयाची २१ वर्षे पूर्ण करण्याआधी सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या यादीत पृथ्वी दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. कालची खेळी ही पृथ्वी शॉचे आयपीएलमधील पाचवे अर्धशतक होते.
या विक्रमात पहिल्या क्रमांकावर दिल्लीचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत आहे. त्याच्या खात्यात आयपीलमध्ये ९ अर्धशतके जमा आहेत. तसेच या शुबमन गिल, अय्यर आणि सॅमसन हे खेळाडू संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या तिघांनीही वयाची २१ वर्षे पूर्ण करण्याआधी आयपीएलमध्ये प्रत्येकी ४ अर्धशतके केली होती.
नाणेफेक गमावलेल्या दिल्लीने प्रथम फलंदाजीला येत २० षटकात ३ बाद १७५ धावा केल्या. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दिल्लीला ९४ धावांची चांगली सलामी दिली. प्रत्युत्तरात चेन्नईला ७ बाद १३१ पर्यंतच मजल मारता आली.