मुंबई - आयपीएल २०२०च्या महासंग्रामात रविवारपर्यंत १८ सामने खेळले गेले आहेत. यात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघानी चांगली कामगिरी नोंदवली आहे. तर राजस्थान, चेन्नई, हैदराबाद आणि पंजाब आपले आव्हान टिकविण्यासाठी झगडत आहेत. संघाच्या कामगिरीत आतापर्यंत काही खेळाडू 'हार्ड हिटर' म्हणून पुढे आले आहेत. ते वारंवार चेंडू सीमारेषेबाहेर टोलावून संघाच्या विजयात योगदान देत आहेत. तर, काही स्फोटक खेळाडू सपशेल फेल ठरल्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. वाचा कोण आहेत ते हार्ड हिटर...
केरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स) -
मुंबई इंडियन्ससाठी केरॉन पोलार्डने आतापर्यंत हार्ड हिटरची भूमिका चोख पार पाडली आहे. त्याने जेव्हा-जेव्हा फलंदाजीची संधी मिळाली आहे, तेव्हा-तेव्हा त्याने षटकार आणि चौकाराचा पाऊस पाडला आहे. आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यांत पोलार्डने १६३ धावा केल्या आहेत. यात त्याने ८ चौकार आणि १३ षटकार खेचले आहेत. ६० ही पोलार्डची या हंगामातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय, पोलार्डने १ गडी बाद केला आहे.
सिमरोन हेटमायर (दिल्ली कॅपिटल्स) -
दिल्ली संघाने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज सिमरोन हेटमायरला ७.७५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले. तो संघासाठी हार्ड हिटर म्हणून आहे. पण त्याला अद्याप आपली छाप सोडता आलेली नाही. हेटमायरने ४ सामन्यात ३५ धावा केल्या आहेत.
ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब) -
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल कोणत्याही गोलंदाजाला फोडून काढण्यासाठी ओळखला जातो. तो निर्भिडपणे फलंदाजी करतो. पण अद्याप त्याला आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपली छाप सोडता आलेली नाही. मॅक्सवेलने आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांत ४१ धावा केल्या आहेत.
आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स) -
आंद्रे रसेलने आयपीएलच्या १२व्या हंगामात गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. त्याचे गगनचुंबी षटकार पाहून, अनेकांना या हंगामात देखील रसेल, विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरणार, असा अंदाज व्यक्त होत होता. पण आतापर्यंत झालेल्या ४ सामन्यांत रसेलला ४८ धावाच करता आल्या आहे. गोलंदाजीत त्याने ४ गडी टिपले आहेत.
महेंद्रसिंह धोनी (चेन्नई सुपर किंग्ज) -
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी आयपीएलमध्ये कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. धोनी जगातील एक उत्तम फिनिशर म्हणून ओळखला जातो. पण आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांत धोनीला ९१ धावाच करता आल्या आहेत. यात त्याने ६ चौकार आणि ४ षटकार खेचले आहेत. ४७ ही धोनीची यंदाच्या आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
रॉबिन उथप्पा (राजस्थान रॉयल्स) -
आयपीएल २०२०मध्ये बेन स्टोक्स पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर पडला. यामुळे संघाच्या हार्ड हिटरची जबाबदारी रॉबिन उथप्पावर होती. पण उथप्पाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याने ४ सामन्यांत फक्त ३३ धावा केल्या आहेत. १७ ही उथप्पाची सर्वोच्च धावसंख्या आहे.
एबी डिव्हिलिअर्स (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) -
विराट कोहलीच्या आरसीबी संघाचा हार्ड हिटर म्हणून डिव्हिलिअर्स आहे. तो या हंगामात सातत्याने धावा करत आहे. त्याने ४ सामन्यांत १७८ च्या सरासरीने १४६ धावा केल्या आहेत. चौकाराचे सांगायचे झाल्यास त्याने या हंगामात आतापर्यंत १३ चौकार आणि ७ षटकार लगावले आहेत. ५५ ही डिव्हिलिअर्सची यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.
केन विल्यमसन (सनरायजर्स हैदराबाद) -
सनरायजर्स हैदराबादचे आजघडीपर्यंत ५ सामने झाले आहेत. यात हैदराबादने केन विल्यमसनला ३ सामन्यात अंतिम संघात घेतले. त्यात विल्यमसनने ५३ धावा केल्या आहेत. आकडेवारी पहिल्यास विल्समसन देखील संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यास अपयशी ठरला आहे.