लाहोर - राहुल द्रविडची ज्युनियर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतर संघाने यशाच्या पायऱ्या चढल्या आहेत. द्रविडपासून बोध घेत पीसीबीने पाकिस्तानमध्ये विविध गटाच्या संघासाठी वेगवेगळे प्रशिक्षक आणि मॅनेजर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
युनूस खान याला पाकिस्तानच्या १९ वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्याचा विचार करण्यात येत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणाऱ्या युनूसने मागील वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. खानने काही सवलती दिल्यास प्रशिक्षक पद स्विकारण्यास तयार असल्याचेही सांगितले.
पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी याबाबत बोलताना म्हणाले, की ऑस्ट्रेलियाने रोडनी मार्श, अॅलन बोर्डर आणि रिकी पाँटिंग यांची नियुक्ती केली आहे. राहुल द्रविडला १९ वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर संघाने दमदार कामगिरी केली आहे. मागील वर्षी द्रविडच्या मार्गदर्शनाखाली १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक जिंकला होता.
मनी पुढे बोलताना म्हणाले, की आमच्या खेळाडूच्या तयारीसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी उभा करण्याचा विचार करावा लागेल. ते देशाचे प्रतिनिधीत्त करतात. विदेशी प्रशिक्षकाबरोबर देशी प्रशिक्षकांची मदत घेणे गरजेचे आहे.