लाहोर - रावळपिंडी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय टी-२० चषक स्पर्धेत नऊ खेळाडू आणि तीन अधिकाऱ्यांनी जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमांचे उल्लंघन केले. या घटनेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) नाराज झाले आहे. पीसीबीने खेळाडू व अधिकाऱ्यांची ओळख जाहीर केली नसली तरी पाकिस्तान वृत्तपत्र ‘द डॉन’च्या म्हणण्यानुसार, मोहम्मद हाफिज, कामरान अकमल, फखर जमान, यासिर शाह, खुरम मंजूर, सोहेल खान, अनवर अली, इमाम उल हक असे खेळाडू यात आहेत. तर, अधिकाऱ्यांमध्ये अब्दुल रझाक, बासित अली आणि राशिद खान अशी नावे आहेत.
पीसीबीने या सर्वांना सक्त ताकीद दिली आहे. भविष्यात कोणी या नियमांचे बबलचे उल्लंघन करेल, त्याला घरी पाठवले जाईल, असे पीसीबीने सांगितले. पीसीबीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार नदीम खान यांनी म्हटले आहे, की काही वरिष्ठ खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय टी-२० चषक स्पर्धेत बायो बबलचे उल्लंघन केल्यामुळे पीसीबी निराश आहे. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. संबंधित खेळाडू आणि अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे, की भविष्यात अशा उल्लंघनांसाठी शून्य सहिष्णुता धोरण अवलंबले जाईल आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पर्धेतून बाहेर केले जाईल."
या सर्व १२ जणांची कोरोना चाचणी झाली असून ते निगेटिव्ह आढळले आहेत.