कराची - आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या पाकिस्तानचा श्रीलंकेने २-० ने पराभव करत मालिकेत विजयी आघाडी घेतली. मालिका गमावल्यानंतर, पाकचे नवनियुक्त प्रशिक्षक मिसबाह उल हक यांनी आपल्या खेळाडूंची कानउघडणी केली.
श्रीलंकेच्या १० प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानच्या दौऱ्यातून ऐनवेळी माघार घेतली. तेव्हा श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्या खेळाडूंना वगळून दुबळा संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी पाठवला. लंकेच्या या संघाने ऐतिहासिक कामगिरी करत, टी-२० क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी असलेल्या पाकिस्तानचा २-० ने पराभव केला. पाकच्या नवनियुक्त प्रशिक्षक मिसबाह यांना हा पराभव जिव्हारीला लागला असून त्यांनी आपल्या खेळाडूंना खडेबोल सुनावले.
मिसबाह यांनी सांगितले की, 'संपूर्ण संघाने फक्त बाबर आझमवर अवलंबून राहू नये. मला वाटते की, आम्हाला बाबरसारखे आणखी किमान सहा खेळाडूंची गरज आहे. संघातील खेळाडूंनी जबाबदारीने खेळ केला तरच संघ विजयी ठरू शकतो. श्रीलंकेविरुध्दची मालिका आमच्यासाठी डोळे उघडणारे ठरली.'
दरम्यान, मिसबाह उल हक यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षकपदासह निवड समितीचीही जबाबदारी दिल आहे. मिसबाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचा संघ पहिलीच मालिका खेळत असून या मालिकेत पाकचा पराभव झाला. श्रीलंका विरुध्द पाकिस्तान संघामध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत असून यातील २ सामने लंकेने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा - पाकिस्तानला लंकेने पाजले पाणी, पहिल्यांदा जिंकली टी-२० मालिका
हेही वाचा - शोएब अख्तरला हिटमॅनची भूरळ..म्हणाला, 'सेहवागपेक्षा रोहितच भारी'