कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इम्रान खानने सरफराज अहमदला राष्ट्रीय संघात परतण्याविषयी कानमंत्र दिला आहे. पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून हटवलेल्या सरफराजने घरगुती क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे इम्रान खानने म्हटले आहे.
हेही वाचा - विंडीजला ५१ धावांचे आव्हान आणि टीम इंडियाचा ५ धावांनी विजय!
'टी-२० क्रिकेटमधील फॉर्म लक्षात न घेता कसोटी आणि एकदिवसीय मालिकेद्वारे खेळाडूंची निवड करण्यात आली पाहिजे. जर सरफराजने घरगुती क्रिकेटवर लक्ष दिले तर, तो संघात नक्की पुनरागमन करू शकतो', असे मत इम्रानने व्यक्त केले आहे. इम्रानने पाकिस्तान क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक मिस्बाह-उल-हकबद्दलही आपले मत मांडले.
'मिसबाह हा एक अतिशय प्रामाणिक माणूस आहे. त्याला खूप अनुभव आहे. मला वाटते की मिसबाह हा एक चांगला पर्याय आहे. त्याच्या नेतृत्वात टीम एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करेल', असे इम्रान खानने म्हटले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सरफराजची संघातून हकालपट्टी केली होती.