लाहोर - पाकिस्तानचा वेगवान आणि घातक गोलंदाज मोहम्मद आमिर ऑगस्टमध्ये होणाऱ्या मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. वेगवान गोलंदाज हारिश राउफचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जूनमध्ये राउफ इंग्लंडला जाणार होता. मात्र, राउफची कोरोना चाचणी तिसऱ्यांदा पॉझिटिव्ह आली आहे.
दुसर्या मुलाच्या जन्माच्या तारखेमुळे आमिरने यापूर्वी इंग्लंडविरूद्धच्या टी-20 दौर्यातून माघार घेतली होती. मात्र, तो आता कोरोना चाचणीसाठी तयार असल्याचे वृत्त आहे. इंग्लंडला जाण्यापूर्वी त्याच्या दोन कोरोना चाचण्या निगेटिव्ह येणे बंधनकारक आहे. कसोटीतून आमिरने निवृत्ती घेतल्यामुळे तो या दौऱ्यात कसोटी मालिकेचा भाग असणार नाही.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना मॅंचेस्टर येथे 5 ते 9 ऑगस्ट, दुसरा सामना एजेस बाऊलमध्ये 13 ते 17 ऑगस्ट आणि तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान साऊथम्प्टन येथे खेळला जाईल. यानंतर दोन्ही संघ 28, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळतील.