गॅले - यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेचा उपविजेता संघ न्यूझीलंड सध्या श्रीलंका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे. १४ ऑगस्टपासून या संघांमध्ये पहिली कसोटी मालिका सुरु झाली. या सामन्याच्या पहिल्या डावात खेळताना न्यूझीलंडच्या टीम साउथीने खास पराक्रम केला आहे.
साऊथीने मास्टर ब्लास्टर सचिनच्या एका विक्रमाची बरोबरी केली. सामन्याच्या पहिल्या डावात खेळताना साऊथीने १९ चेंडूत १४ धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने एक षटकारही लगावला. कसोटीमध्ये षटकार मारण्याच्या फलंदाजांमध्ये साऊथीने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. सचिनने २०० कसोटी सामन्यात ६९ षटकार मारले आहेत. तर, साऊथीने ६६ सामन्यांतच ६९ षटकार खेचले आहेत. त्यामुळे या विक्रमामध्ये सचिनपेक्षा साऊथीच सरस ठरला आहे.
कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये न्यूझीलंड माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम आहे. त्याने १०१ कसोटीत १०७ षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट आहे. त्याने १०० षटकार मारले आहेत.
या कसोटीत फलंदाजीचा निर्णय घेत न्यूझीलंडने पहिल्या डावात २४९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २६७ धावांत आटोपला आणि श्रीलंकेने १८ धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात सर्वबाद २८५ धावा केल्या आहेत.