लंडन - इंग्लंड आणि वेल्समध्ये १ जुलैपर्यंत क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जाणार नाहीत, असे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) शुक्रवारी जाहीर केले आहे. ईसीबीने यापूर्वी जाहीर केले होते की २ मेपर्यंत कोणतेही क्रिकेट खेळले जाणार नाही. परंतु सध्याची परिस्थिती पाहता आता जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गुरुवारी ईसीबी बोर्डाच्या बैठकीत अनेक उपाययोजनांना मान्यता देण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या संदर्भात इंग्लंडच्या पुरुष आणि महिला संघांचे वेळापत्रक जुलैपासून सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होईल. यात वेस्ट इंडिजसह कसोटी मालिकेचा समावेश आहे. त्याचबरोबर महिला संघाच्या भारत विरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय वेळापत्रकातही बदल करण्यात येणार आहे.
घरगुती क्रिकेटच्या संदर्भात, २८ मेपासून सुरू होणारी टी-२० ब्लास्ट स्पर्धा हंगामाच्या शेवटपर्यंत पुढे ढकलली जाईल. जूनमध्ये होणाऱ्या सर्व गट टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक हंगामाच्या शेवटी पुन्हा तयार होईल.
त्याशिवाय द हंड्रेड टूर्नामेंटचे भवितव्य निश्चित करण्यासाठी ईसीबीची २९ एप्रिल रोजी बैठक होणार आहे. मंडळाने यापूर्वी ही स्पर्धा त्यांची प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे.