वेलिंग्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पत्रकारांशी वार्तालाप केला. यादरम्यान त्याने न्यूझीलंड मायदेशात खेळत असल्याने ते विजयाचे प्रबळ दावेदार असल्याचे म्हटलं आहे.
रहाणे म्हणाला, मला वाटतं की न्यूझीलंड मायदेशात खेळत असल्याने ते विजयाचे दावेदार म्हणून मैदानात उतरतील. पण भारतालाही विजयासाठी संधी आहे. कारण न्यूझीलंडमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी कशी करावी हे भारतीय खेळाडू जाणून आहेत.
न्यूझीलंडमध्ये प्रथम फलंदाजी करताना मानसिकता नेहमी साकारात्मक ठेवावी लागेल. पहिल्या डावात कमीत कमी ३२० धावा जमवणे गरजेचे आहे. या धावा गोलंदाजीसाठी पुरेशा ठरतील. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात जेव्हा भारताने पहिल्या डावात ३२० हून अधिक धावा केल्या आहेत. ते सर्व सामने भारताने जिंकले आहेत, असेही रहाणे म्हणाला.
पुढे बोलताना रहाणे म्हणाला, आम्ही जाणतो आमचे गोलंदाज कोणत्याही स्थितीत विकेट घेऊ शकतात. समजा जर आम्ही नाणेफेक गमावली. तर प्रथम फलंदाजी करण्याची मानसिकता ठेवावी लागेल. तसेच स्विंग चेंडूचा सामना करण्याचे मानसिकता हवी. ही बाब नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजांसाठी लागू होते. गोलंदाजांना २० बळी टिपण्याचा विश्वास असायला हवा.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून (२१ फेब्रवारी) सुरूवात होणार आहे. पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राईस्टचर्च येथे होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरु होणार आहेत.
हेही वाचा -
पाक खेळाडूंचा डान्स व्हिडिओ; चाहते म्हणाले, मुहल्ले की चुडैल....!
हेही वाचा -
VIDEO : टीम इंडियाची वेलिंग्टनमधील भारतीय उच्चायुक्तालयाला भेट, विराट म्हणाला....