वेलिंग्टन - कोरोनानंतरच्या दीर्घ विश्रांतीनंतर न्यूझीलंडचे क्रिकेटपटू लिंकनमधील हाय परफॉरमन्स सेंटरमध्ये या आठवड्यापासून सरावाला सुरूवात करणार आहेत. येत्या काही महिन्यात सहा राष्ट्रीय शिबिरे आयोजित केली जातील, असे न्यूझीलंड क्रिकेटने (एनझेडसी) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
''न्यूझीलंडचे पुरुष आणि महिला क्रिकेटपटू या आठवड्यात लिंकनच्या हाय परफॉरमन्स सेंटरमध्ये संघाच्या सरावासाठी परत येणार आहेत. येत्या काही महिन्यांत होणाऱ्या सहा राष्ट्रीय शिबिरांपैकी हे पहिले शिबिर असेल. दक्षिण बेट आणि वेलिंग्टन येथे राहणारे पुरुष व महिला खेळाडू या आठवड्यात केंटरबरी येथे सराव करतील. तर 19 जुलैपासून माउंट मॉनगानुईच्या बे ओव्हल येथे खेळाडूंसाठी दुसरे मोठे शिबिर आयोजित केले जाणार आहे", असे न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले आहे.
न्यूझीलंड हा कोरोनामुक्त झालेला पहिला देश ठरला आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोनाची 1500 प्रकरणे होती. त्यापैकी 1400 हून अधिक बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशात 22 लोकांचा मृत्यू झाला आहे.
न्यूझीलंडमध्ये लॉकडाउन उठल्यानंतर, क्रीडा स्पर्धांचे कार्यक्रमही सुरू झाले आहेत. गेल्या महिन्यात 13 जून रोजी ऑकलंड ब्लूज आणि वेलिंग्टन हरिकेन्स या संघांनी सुपर रग्बी लीगमध्ये भाग घेतला होता. या सामन्यात ऑकलंडने विजय मिळवला होता. हा सामना पाहण्यासाठी तब्बल 43 हजार चाहते स्टेडियममध्ये दाखल झाले होते. तब्बल 15 वर्षानंतर इतक्या प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये हा सामना पाहिला होता.
कोरोनाव्हायरसनंतर न्यूझीलंडमध्ये आयोजित केलेली ही पहिली व्यावसायिक क्रीडा स्पर्धा होती. न्युझीलंडशिवाय इतरही अनेक देशांनी खेळासाठी सराव करण्यास परवानगी दिली आहे.