ऑकलंड - न्यूझीलंड क्रिकेटचे (एनझेडसी) उपमुख्य कार्यकारी अधिकारी अँथनी क्रमी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोरोनामुळे न्यूझीलंड क्रिकेट मंडळ आर्थिक संकाटत सापडले असून त्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर, क्रमी पायउतार झाले आहेत.
कोरोनामुळे न्यूझीलंड क्रिकेटवर (एनझेडसी) वाईट परिणाम झाला आहे. 60 लाख डॉलर्सची बचत करण्यासाठी मंडळाने आपल्या कर्मचार्यांपैकी 10 ते 15 टक्के कर्मचार्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. 2015 च्या विश्वकरंडक स्पर्धेवेळी क्रमी यांनी संघाची जबाबदारी घेतली होती.
सहा मोठ्या संघटना, जिल्हा व क्लब यांना वित्तपुरवठा करण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी सांगितले. ते म्हणाले, "आमच्या वर्षाची प्राथमिकता निश्चित आहे ज्याच्याशी आपण तडजोड करू शकत नाही. आम्ही त्यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही. एनझेडसीकडून कपात करण्यात येत आहे."
व्हाईट पुढे म्हणाले, "न्यूझीलंडमधील इतर व्यवसायही हे नुकसान अनुभवत आहेत. ही एक अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि आपल्याला यावर मात केली पाहिजे, जेणेकरुन आपण न्यूझीलंड क्रिकेटला मजबूत बनवू शकू. आमचे सदस्यही चांगली कामगिरी करतील."