नवी दिल्ली - उद्या गुरुवारी होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सर्वसाधारण बैठकीत (एजीएम) नव्या क्रिकेट सल्लागार समितीची (सीएसी) घोषणा होणार आहे. ही समिती इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तीन राष्ट्रीय निवडकर्त्यांची निवड करेल. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येईल.
हेही वाचा - डॉन ब्रॅडमन यांच्या 'त्या' कॅपचा लिलाव..मिळाली 'इतकी' किंमत
मदनलाल यांच्या अध्यक्षतेखालील समिती फक्त एका बैठकीसाठी तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या आगामी बैठकीनंतर नवीन सीएसी कार्यभार स्वीकारेल. बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, की मदनलाल, रुद्र प्रताप सिंह आणि सुलक्षना नाईक यांची निवड फक्त एका बैठकीसाठी करण्यात आली होती. त्यात सुनील जोशी आणि हरविंदरसिंग यांची निवडकर्ता म्हणून निवड झाली.
तीन प्रांतातील निवडकांच्या पदांसाठी काही नामांकित अर्ज आले आहेत. यातले सर्वात मोठे नाव माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे आहे. भारतासाठी सर्व स्वरूपात आगरकरने २००हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे.
आगरकर हा पश्चिमेकडील आबे कुरुविला यांच्यासह दावेदार आहे. तर उत्तर प्रदेशातील मनिंदरसिंग आणि चेतन शर्मा यांनी अर्ज केला आहे. पूर्व कसोटी सलामीवीर शिव सुंदर दास हे पूर्व विभागातून अर्ज करणारे माजी खेळाडू आहेत.