अबुधाबी - 'करो या मरो' सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव करत, विराट कोहलीच्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. विजयासाठी दिलेले १३२ धावांचे आव्हान हैदराबादच्या विल्यमसन-होल्डर जोडीने संयमी फलंदाजी करत पूर्ण केले. मुलाखतीत बोलताना विराटने पराभवाचे खापर फलंदाजावर फोडले. तसेच त्याने आपल्या चुकांची कबुली दिली.
पराभवावर काय म्हणाला विराट -
फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, आम्ही हैदराबादसमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेऊ शकलो नाही. पण, गोलंदाजीच्या वेळी आम्ही अप्रतिम कामगिरी करत सामन्यात पुनरागमन देखील केले. काही चुकांमुळे सामना हातातून निसटला. असे असले तरी मूळ मुद्दा हा, फलंदाजीचा होता. आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाही. मागील काही सामन्यात आमच्याकडून खराब कामगिरी झाली. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची जी बलस्थाने होती, त्याचा त्यांनी वापर केला. एकूणच काय तर आम्हाला त्यांच्यावर दडपण आणता आले नाही, अशी कबुली विराटने दिली.
पडीक्कल-सिराजचे कौतुक
शेवटचे ४-५ सामने हे आमच्यासाठी खूपच विचित्र ठरले. आम्ही सरळ क्षेत्ररक्षकांच्या हातात कॅच देऊन विकेट फेकल्या. पण आमच्या काही खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. त्याच्यासाठी हा हंगाम चांगला राहिला. यात देवदत्त पडीक्कल, मोहम्मद सिराज या नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. युझवेंद्र चहल आणि डिव्हिलियर्स यांनी नेहमीप्रमाणे खूपच अप्रतिम कामगिरी केली. देवदत्त पडीक्कलचे विशेष कौतुक आहे कारण एकाच स्पर्धेत ४०० हून अधिक धावा करणे ही सोपी गोष्ट नाही, असेही विराटने सांगितले.
असा रंगला सामना -
बंगळुरुने हैदराबादला १३२ धावांचे आव्हान दिले होते. विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केले. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. त्याला होल्डरने २४ धावा करत मोलाची साथ दिली.
हेही वाचा - वॉर्नरने ११ व्यांदा जिंकली नाणेफेक; ११ नंबरचा आयपीएल चषकाशी आहे 'जवळ'चा संबंध
हेही वाचा - बंगळुरुला नमवून हैदराबाद 'क्लालिफायर'मध्ये, आता गाठ दिल्लीशी