मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी संघटनेच्या ( नाडा ) कक्षेत येण्यास तयार असल्याची माहिती क्रीडा सचिव राधेश्याम झुलानिया यांनी दिली. झुलानिया यांनी नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांच्यासह बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी, बोर्डाचे महाव्यवस्थापक साबा करीम यांची शुक्रवारी भेट घेतली. याबाबत बीसीसीआयने लेखी दिले आहे असून त्यामध्ये, ते नाडाचे डोपिंगविरोधी धोरण स्वीकारण्यास तयार आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, बीसीसीआयने मागील काही वर्षांपासून नाडाला कडाडून विरोध केला होता.
बीसीसीआयने स्वीकारलेल्या धोरणामुळे, आता सर्व क्रिकेटपटूंची नाडा चाचणी होऊ शकते. याविषयी बोलताना झुलनिया म्हणाले, 'बीसीसीआयने डोपिंग चाचणी किटची गुणवत्ता, पॅथॉलॉजिस्टची क्षमता आणि नमुने गोळा करण्याची प्रक्रिया याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, त्यांना हव्या असलेल्या सुविधा दिल्या जातील, याची हमी आम्ही दिली आहे. आम्ही त्यांना सुविधा देऊ, पण त्यासाठी काही शुल्क आकारले जातील. बीसीसीआय इतरांपेक्षा वेगळे नाही. नाडा क्रिकेटपटूंची कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी चाचणी करू शकते. आता बीसीसीआय नाडाच्या सर्व नियमांचे पालन करण्यास तयार आहे'.
मागील काही वर्षांपासून बीसीसीआयने नाडा एक स्वायत्त संस्था आहे, राष्ट्रीय क्रीडा महासंघ नाही आणि त्यामुळे ते सरकारकडून मिळत असलेल्या निधीवर अवलंबून नाही असे सांगत नाडाच्या कक्षेत येण्यास नकार दिला होता. मात्र, अलीकडेच भारत दौर्यावर येणार्या दक्षिण आफ्रिका 'अ' आणि महिला संघांना व्हिसा मिळण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत होते. हे करून केंद्र सरकार बीसीसीआयवर नाडाच्या कक्षेत येण्यासाठी दबाव आणत आहे, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आता या संघांना व्हिसा मिळणार आहे, असे बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी सांगितले.