मुंबई - इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सनं सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. या 'सुपर' विजयासह मुंबई पलटननं आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सला मागे टाकत दुसरं स्थान मिळवलं आहे.
आयपीएलमध्ये काल खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमोर १६३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदाराबादच्या संघाला १६२ धावा करत्या आल्या. त्यामुळे सामना टाय झाल्यानं सुपर ओव्हर खेळवण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करत ९ धावांचं आव्हान मुंबईसमोर ठेवलं. मुंबईच्या संघानं हे आव्हान अवघ्या ३ चेंडूत पार करत प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय.
मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघाच्या खात्यात १६ गुण जमा आहेत, मात्र मुंबईचा संघ रनरेटमध्ये सरस ठरल्यानं दिल्लीच्या संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलाय. तर धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज १८ गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहे. कालच्या सामन्यात पराभव झाल्यानं हैदराबादच्या स्थानात कोणताही बदल झाला नसून ते १२ गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहेत.
या सत्रात चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या ३ संघांनी प्ले ऑफमधील आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळं उरलेल्या चौथ्या क्रमांकासाठी पंजाब, कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थान यांना आता प्रत्येक सामना जिंकणं अत्यावश्यक बनलं आहे.