मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार इनडोअर स्टेडियमवर चालू असलेल्या कर्नाटकविरूद्धच्या सामन्यात मुंबईचा पहिला डाव १९४ धावांवर आटोपला आहे. मुंबईचा भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने परत एकदा एकाकी झुंज देत संघाला तारले. त्याने ९४ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांसह केलेल्या ७७ धावांच्या खेळीमुळे मुंबईला किमान दोनशे धावसंख्येच्या जवळपास जाता आले.
हेही वाचा - क्रिकेटचा देव सचिनही झालाय या मड्डारामवर फिदा...!!
कर्नाटकचा कर्णधार करुण नायरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. व्ही. कौशिकच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर मुंबईचे सहा फलंदाज ८६ धावांत तंबूत परतले होते. मुंबईचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे अवघ्या ७ धावा करून माघारी परतला. पृथ्वीने संयमी खेळ करीत ५७ चेंडूंत सहा चौकारांसह २९ धावा केल्या, मात्र, त्याला मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमारने शशांक अत्तार्डेच्या (५१ चेंडूंत सहा चौकारांसह ३५ धावा) साथीने सातव्या गड्य़ासाठी ९२ चेंडूंत ८८ धावांची भागिदारी करीत मुंबईचा डाव सावरला.
मुंबईनंतर फलंदाजीस उतरलेल्या कर्नाटकचीसुद्धा ३ बाद ७९ अशी दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे कर्नाटकचा संघ ११५ धावांनी पिछाडीवर आहे. सलामीवीर देवदत्त पडिक्कल (३२) आणि आर. समर्थ (नाबाद ४०) यांनी कर्नाटकला ६८ धावांची दमदार सलामी करून दिली. मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज शाम्स मुलानीने पडिक्कल आणि अभिषेक रेड्डी (०) यांना एकाच षटकात बाद करून कर्नाटकला गोत्यात आणले आहे.
धावफलक -
मुंबई (पहिला डाव) : ५५.५ षटकांत सर्व बाद १९४ (सूर्यकुमार यादव ७७, शशांक अत्तार्डे ३५; व्ही. कौशिक ३/४५, प्रतीक जैन २/२०)
कर्नाटक (पहिला डाव) : २४ षटकांत ३ बाद ७९ (आर. समर्थ खेळत आहे ४०; शाम्स मुलानी २/२०)