चेन्नई - शम्स मुलाणीच्या ८७ आणि कर्णधार आदित्य तरेच्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर मुंबईने आपल्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केली. तमिळनाडूविरूद्ध सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईने सहा गडी गमावत २८४ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
हेही वाचा - पांड्या फिटनेस टेस्टमध्ये 'नापास', न्यूझीलंड दौऱ्यासाठी 'या' अष्टपैलू खेळाडूची निवड
जय बिश्ता (४१) आणि भूपेन लालवाणी (२१) यांनी पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचली. जयला साई किशोरने बाद केले. ७९ धावांवर मुंबईचा संघ असताना लालवाणी किशोरचा दुसरा बळी ठरला. सिद्धेश लाडला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर, हार्दिक तामोर आणि सर्फराज खानने चांगली सुरुवात केली पण त्यांना मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. दोघांनी अनुक्रमे २१ आणि ३६ धावा केल्या.
त्यानंतर मुलाणी आणि तरे यांनी संघाचा डाव सांभाळला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. मुलाणी बाद होताच खेळ थांबवण्यात आला. मुलाणीने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार तर, तरेने आत्तापर्यंत नऊ चौकार ठोकले आहेत. चेन्नईकडून रविचंद्रन अश्विन आणि साई किशोर यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.