मुंबई - भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दीपक चहरच्या दुखापतीविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी चहर एप्रिल २०२० पर्यंत भारतीय संघात परत येऊ शकणार, नसल्याचे भाष्य केले आहे. दीपक चहरला नुकतीच खेळवण्यात आलेल्या वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुखापत झाली होती. यामुळं तो तिसरा आणि निर्णायक सामना खेळू शकला नाही.
भारतीय संघ जानेवारी महिन्यात श्रीलंका विरुद्ध ३ टी-२० आणि ऑस्ट्रेलियासोबत ३ सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना एमएसके प्रसाद यांनी दीपक चहर विषयी भाष्य केले.
एमएसके प्रसाद यांनी सांगितले की, 'दीपक चहरला विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाठीला दुखापत झाली. यामुळं तो निर्णायक सामना खेळू शकला नाही. चहरची दुखापत पाहून तो एप्रिल २०२० पर्यंत भारतीय संघात परत येईल, असे मला वाटत नाही. मात्र, आमच्याकडे क्रिकेटच्या तिनही प्रकारासाठी पुढील ७ वर्षांपर्यंत पर्याय उपलब्ध आहेत.'
भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० मालिकेचा पहिला सामना ५ जानेवारीला गुवाहाटीच्या मैदानात रंगणार आहे. तर दुसरा सामना ७ जानेवारीला इंदौरमध्ये, तिसरा १० जानेवारीला पुण्यामध्ये खेळवण्यात येणार आहे.
- टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंगटन सुंदर.
भारत-ऑस्ट्रेलिया संघात पहिला एकदिवसीय सामना १४ जानेवारीला मुंबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा १७ जानेवारीला राजकोटमध्ये आणि तिसरा १९ जानेवारीला बंगळुरूच्या मैदानात रंगणार आहे.
- एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि केदार जाधव.