दुबई - राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पराभवामुळे टीकेचा धनी ठरलेल्या धोनीकडे आज सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएलच्या तेराव्या सत्रात आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात धोनीच्या फलंदाजीव्यतिरिक्त त्याच्या एका खास विक्रमाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
भारताचा महान कर्णधार म्हणून ओळख मिळालेल्या धोनीला टी२० क्रिकेटमध्ये ३०० षटकारांचा टप्पा गाठता येणार आहे. धोनीने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात तीन उत्तुंग षटकार लगावले. त्यामुळे त्याच्या खात्यात आता २९८ टी-२० षटकार आहेत. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात २ षटकार मारताच ३०० षटकारांचा टप्पा धोनी पार करेल. या विक्रमाच्या यादीत रोहित शर्मा (३६१) अव्वल आणि सुरेश रैना (३११) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्याबद्दल धोनीवर टीका झाली होती. आवश्यक क्षणी धावा जमवण्याऐवजी धोनीने सामना हातातून निसटल्यानंतर फटकेबाजी केली. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही धोनीवर टीका केली. शेवटच्या तीन षटकारांचा काहीही उपयोग नव्हता, त्या धोनीच्या वैयक्तिक धावा होत्या, असे त्याने म्हटले.
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी खूप धावा दिल्या. यात २०वे षटक तर चेन्नईसाठी खूप महागडे ठरले होते. २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ २०० धावा करू शकला.