दुबई - मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील मूळ सामना टाय झाला. तेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबने सुपर ओव्हरमध्ये ५ धावा केल्या. शमीने भेदक मारा करत सुपर ओव्हरमध्ये देखील सामना पुन्हा टाय केला. यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने सामना जिंकला. या सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार केएल राहुलने मोहम्मद शमीचे कौतुक केले.
राहुल म्हणाला, 'पहिल्या सुपर ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडू यॉर्कर टाकायचा, असा विचार मोहम्मद शमीचा होता. त्याने भेदक गोलंदाजीचा नजराणा दिला. त्याची गोलंदाजी प्रत्येक सामन्यागणिक अधिक धारदार होत आहे.
आम्हाला पॉवर प्लेमध्ये अधिक धावा कराव्या लागतील. ख्रिस गेल आणि निकोलस पूरन हे दोघे फिरकीपटूविरुद्ध धावा करतील, याची मला जाण आहे. ख्रिस गेल संघात परतल्याने, फलंदाजाची चिंता मिटली अन् माझे काम सोपे झाल्याचे देखील राहुल म्हणाला.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज केरॉन पोलार्डने सांगितले की, पंजाबने चांगला खेळ केला. त्यांनी आम्हाला पराभूत केले आणि ते दोन गुणांसाठी पात्र होते. राहुलने मैदानात शेवटपर्यंत तळ ठोकत धमाकेदार खेळी केली.
रविवारी सायंकाळी मुंबई आणि पंजाब या दोन संघांमध्ये सामना रंगला. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १७६ धावा केल्या. तेव्हा पंजाबने देखील प्रत्युत्तरादाखल १७६ धावा केल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये बुमराहने भेदक मारा करत ५ धावा देऊन २ बळी घेतले. या धावसंख्येचा पंजाबच्या मोहम्मद शमीने यशस्वी बचाव केला. शमीने शेवटच्या चेंडूवर एक धावं दिली. सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्याने एकाच सामन्यात दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यावेळी पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने गोलंदाजी करत ११ धावा दिल्या. १२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार खेचत मयांक अग्रवालने संघाला विजय मिळवून दिला.