नवी दिल्ली - भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजच्या नावे एक मोठा विक्रम प्रस्थापित झाला आहे. कालपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेचा पहिला सामना लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.
या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच मिताली राज सर्वाधिक काळ एकदिवसीय क्रिकेट खेळणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. १९९९मध्ये मितालीने आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
मितालीपूर्वी दुसऱ्या क्रमांकावर एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीच्या बाबतीत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याचे नाव होते. जयसूर्याने २१ वर्षे आणि १८४ दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळले होते. आता मितालीने त्याला पराभूत केले आहे. मितालीने २१ वर्षे आणि २५४ दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळले आहे. अद्याप ती खेळत आहे.
या विक्रमात दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचे नाव अग्रस्थानी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची एकदिवसीय कारकीर्द २२ वर्षे आणि ९१ दिवस अशी आहे. तर, चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद (२० वर्षे आणि २७२ दिवस) यांचे नाव आहे.