लखनऊ - भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने आज शुक्रवारी मोठा विक्रम रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० किंवा त्याहून अधिक धावा काढणारी ती दुसरी आणि भारताची पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात ४६.७३च्या सरासरीने १०,००० धावा पूर्ण केल्या.
३८ वर्षीय मितालीने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०.५३च्या सरासरीने ६,९७४धावा केल्या आहेत. याशिवाय तिने टी -२० मध्ये २३६४. आणि कसोटीत ६६३ धावा केल्या आहेत. मितालीने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत ७५ अर्धशतके आणि ८ शतकेही केली आहेत.
भारतासाठी मितालीने एकदिवसीय आणि टी-२० मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर कसोटीत संध्या अग्रवाल (१११० धावा), शांता रंगास्वामी (७५० धावा) आणि शुभांगी कुलकर्णी (७०० धावा) नंतर ती चौथ्या क्रमांकावरची खेळाडू ठरली आहे. इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड्स ही मितालीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० पेक्षा जास्त धावा करणारी एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.
एडवर्ड्सने वयाच्या ४१व्या वर्षी २०१६मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तिने १९१ एकदिवसीय सामन्यात ५९९२ धावा आणि ९५ टी-२० सामन्यांमध्ये २६०५ धावा आणि २३ कसोटी सामन्यात ६७६ धावा केल्या आहेत.