सिडनी - यंदाच्या आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय बदलणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सांगितले आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी स्टार्कने आयपीएल खेळणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, हा वर्ल्डकप स्थगित करण्यात आला आहे.
वर्ल्डकप स्थगित झाल्यामुळे आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये घेण्यात येणार आहे. स्टार्क म्हणाला, "मला माहिती आहे, की दूरदृष्टी ही चांगली गोष्ट आहे आणि आता आयपीएल वेगळ्या वेळी होत आहे. पण मी माझा निर्णय बदलणार नाही. मी उन्हाळ्याच्या हंगामासाठी तयारी करेन. "
तो म्हणाला, ''आता पुढच्या वर्षी आयपीएल होईल आणि जेव्हा मला खेळायची इच्छा होईल तेव्हा मी विचार करेन. परंतु, या वर्षी मी माझ्या निर्णयामुळे खूप खूश आहे."
अखेरच्या वेळी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून स्टार्क 2015 मध्ये खेळला होता. दुखापतीमुळे 2016 च्या हंगामात तो खेळू शकला नाही. स्टार्क 2018 च्या आयपीएलसाठी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत होते. कोलकाता नाइट रायडर्सने संघात घेतले. मात्र, दुखापतीमुळे तो पुन्हा आयपीएलमध्ये भाग घेऊ शकला नाही. 2019 च्या वर्ल्डकपमुळे स्टार्कने पुन्हा आयपीएलमध्ये भाग घेतला नाही.