कराची - पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता मिसबाह-उल-हकने यंदा होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. मिसबाह म्हणाला, ''अधिकार्यांनी घाईने टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलू नये. प्राणघातक कोरोना विषाणूनंतर परिस्थिती जेव्हा सामान्य होईल तेव्हा प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा आयोजित करणे, मोठी गोष्ट ठरेल.''
मिसबाह म्हणाला, ''सध्याच्या परिस्थितीमुळे प्रवास आणि मुक्काम करणे आव्हानात्मक आहे. लॉजिस्टिक्सनुसार, 16 संघांचे आयोजन करणे सोपे होणार नाही, परंतु अधिकार्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी एक महिना किंवा अधिक प्रतीक्षा करावी.''
मिसबाह पुढे म्हणाला, “सर्वांना टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पाहण्याची इच्छा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उपक्रम पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर क्रिकेटसाठी ही सर्वात चांगली गोष्ट असेल.
कोरोनाच्या साथीमुळे केवळ क्रिकेटच नव्हे तर अनेक क्रीडा उपक्रमांना 'ब्रेक' लावण्यात आला आहे. भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले असून सर्वांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.