लंडन - इंग्लंडचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचा कट्टर टीकाकार मायकेल वॉनने सध्या सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेवर भाष्य केले आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेलेल्या विराटसेनेला तिन्ही प्रकारांत पराभव पत्करावा लागेल, असे भाकीत वॉनने केले आहे. सिडनी येथे झालेल्या सलामीच्या एकदिवसीय सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला ६६ धावांनी पराभूत केले.
''मला वाटते की, या दौर्यामध्ये ऑस्ट्रेलिया भारताला तिन्ही प्रकारांत वाईट पद्धतीने पराभूत करेल'', असे वॉनने ट्विटमध्ये म्हटले. भारतीय संघासाठी अत्यंत वाईट ठरलेल्या पाच गोलंदाजांना खेळवण्याची रणनीती वॉनला पसंत नाही.
तो म्हणाला, ''फक्त पाच गोलंदाजांचे पर्याय आणि अशा फलंदाजीमुळे भारतीय एकदिवसीय संघ मला जुन्या डावपेचांसारखा दिसतो. आपला कोटा संपवण्यात भारताला चार तासापेक्षा जास्त वेळ लागला. भारताची षटकांची गती खूप वाईट आहे. बचावात्मक. फील्डिंग खूप धक्कादायक (वाईट). दुसरीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडू विलक्षण होते.''
स्टीव्ह स्मिथला सामनावीर पुरस्कार -
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ५० षटकांत ६ बाद ३७४ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५० षटकांत ८ बाद ३०८ धावा करता आल्या. संघासाठी तडाखेबंद शतक ठोकणाऱ्या स्टीव्ह स्मिथला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. स्मिथने ६६ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकार लगावत १०५ धावा केल्या.