वेलिंग्टन - न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि सध्याचा फलंदाजी प्रशिक्षक क्रेग मॅकमिलन यांनी त्याच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. क्रेग मॅकमिलन आयसीसी विश्वचषक २०१९ नंतर न्यूझीलंड संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा देणार आहे. भारताविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्याच्या मालिकेनंतर त्याने ही घोषणा केली.
मॅकमिलन म्हणाला, की मी हे पद गेल्या ५ वर्षापासून संभाळत आहे. विश्वचषकानंतर हे पद मी स्वीकारणार नाही. मी खूप भाग्यशाली आहे की मला रॉस टेलर, ब्रेंडन मॅक्युलम, केन विलियमसन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मॅकमिलने ५५ कसोटी आणि १९७ एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडकडून प्रतिनिधीत्व केले आहे. मॅकमिलनच्या मार्गदर्शनाखालीच संघाने विश्वचषक २०१५ च्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.
आयसीसी विश्वचषक ३० मे ते १४ जुलै या दरम्यान इंग्लंडमध्ये खेळविण्यात येणार आहे. इंग्लंड आणि भारतासोबतच न्यूझीलंडचा संघादेखील विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. न्यूझीलंड संघाच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा श्रीलंका दौऱ्यापूर्वी करण्यात येईल.