नवी दिल्ली - भारतीय क्रीडा इतिहासात पहिल्यादांच एका महिला अॅथलिटची 'पद्मविभूषण' पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. बॉक्सिंगमध्ये सहा वेळा विश्वविजेती ठरलेली बॉक्सर मेरी कोम हिचे नाव देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. या आधी मेरी कोमला २०१३ साली 'पद्मभूषण' तर २०१६ साली 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इतर पद्म पुरस्कारांसाठीही क्रीडा मंत्रालयाने यंदा महिला खेळाडूंचे नावच पुढे केले आहे.
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या पी.व्ही.सिंधूला पद्मभूषण पुरस्कारासाठी नाव सुचवण्यात आले आहे. तर कुस्तीपटू विनेश फोगट, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि हॉकीपटू राणी रामपाल, नेमबाजपटू सुमा शिरुर, टेबल टेनिसस्टार मनिका बत्रा आणि ताशी-नुंगशी या जुळ्या बहिणींचे नाव पद्मश्री पुरस्कारासाठी सुचवण्यात आले आहे.
पी.व्ही.सिंधूचे नाव २०१७ सालीही पद्मविभूषणसाठी सुचवण्यात आले होते. पण तेव्हा तिला हा सन्मान मिळाला नाही. तत्पू्र्वी २०१५ मध्ये सिंधूला 'पद्मश्री' पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
दरम्यान, 'पद्मविभूषण' सन्मान आतापर्यंत तीन पुरुष खेळाडूंना मिळाला आहे. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद (२००७), सचिन तेंडुलकर (२००८) आणि गिर्यारोहक सर एडमंड हिलरी (२००८, मरणोत्तर) हे खेळाडू पद्मविभूषण आहेत.
क्रीडा मंत्रालयाने या सर्व खेळाडूंची यादी गृह मंत्रालयाने पाठवली आहे. आगामी प्रजासत्ताक दिनापूर्वी अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यामुळे यातील किती महिला खेळाडूंचे नाव अंतिम यादीत येईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.